माॅडर्न महाविद्यालयामध्ये "लघु फिल्म कार्यशाळा" संपन्न
पुणे,(सह्याद्री बुलेटीन)-माॅडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर येथील, हिंदी विभागाच्या " हिंदी फिल्म क्लब " च्या माध्यमातून अलीकडेच एकदिवसीय "लघु फिल्म कार्यशाळा" पार पडली. या कार्यशाळेमध्ये हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माता, एडिटर अभिजीत मोरे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते,लघु चित्रपट निर्मितीची प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. शिवाय लघु चित्रपटांचे विषय, भाव, संवेदना, त्याच्या प्रस्तुतीसंदर्भातील महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला.



लघु चित्रपट लेखनासाठी मार्मिकतेची आवश्यकता महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "उठान" हा लघु चित्रपट यावेळी दाखविला गेला. त्यांनी चित्रपट निर्मितीमध्ये विविध साधनांचा उपयोग कसा होतो आणि पटकथा लेखन, संवाद, ध्वनि, लोकेशन, एडिटिंग, कॅमेरा, अभिनय इत्यादींसंदर्भात त्यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. राजेंद्र झुंजारराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांना चित्रपटांमध्ये असलेल्या विविध संधींबाबत महत्वाची माहिती दिली. संगणक विभाग प्रमुख प्रा. शामकांत देशमुख यांच्या सहकार्याने या संपूर्ण कार्यशाळेचे आयोजन हिंदी विभागप्रमुख डाॅ. प्रेरणा उबाळे यांनी केले आणि कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजनामागील भूमिका सविस्तरपणे मांडली.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. असीर मुलाणी यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या हिंदी विभागातील प्रा. समाधान भडकुंबे, मराठी विभागातील प्रा. वैजयंतीमाला जाधव, अॅनिमेशन विभागातील प्रा. अश्वती नायर, पूना काॅलेज येथील हिंदी विभाग प्रमुख डाॅ. शाकिर शेख आणि अनेक प्राध्यापक शिवाय पुण्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.